मुझको भी तो लिफ्ट करादे,
थोडी सी तो लिफ्ट करादे...
इतके हतबल कधी कोणी होवू नये. मला अजून ही आठवतंय, माझी लेक मला विचारायला आली होती, "आई, शाळेत क्रिकेट सुरू झालेय. मी पण भाग घेऊ का?" खेळाची भूक भागेल या गरजेवर आणि काहीतरी नवीन या कुतूहलाने मी ही आनंदाने हो म्हंटले. बहुदा सर्व पालक असाच विचार करत असावेत. तेंव्हा माझी लेक चौथ्या इयत्तेत होती आणि तिच्या सोबतच्या मुलीही बऱ्यापैकी त्याच वयोगटातील होत्या. इतक्या लहान वयात करीयरच्या दिशा ठरवणेही कठीणच असते. मग सुरू झाली शनिवार रविवार २ तास क्रिकेट प्रॅक्टीस. तेंव्हा मुलींना मुलांमध्येच प्रॅक्टीस करावी लागत असे. कारण तेवढ्या संख्येने मुली नसायच्या. पुढे या प्रवासात अनेक सोबती भेटत गेले. मुलींसारखेच पालकांचे ही ग्रुप बनत होते. फक्त मुलींना या खेळाची आवड आहे हे माहीत होते, पण पुढे काय घडेल याचा विचार कोणीही केला नव्हता. मुळात या क्षेत्रातील माहितीही आम्हा पालकांकडे फारशी नव्हती. आता हळूहळू क्रिकेटची गाडी एकएक वळण घेत, सारे चढउतार करत छोट्या छोट्या स्टेशन्सवरून पुढे जाऊ लागली. प्रायव्हेट टुर्नामेंट, अंडर १६, अंडर १९, सिनियर वुमेन्स, एमसीए असा प्रवास सुरू झाला. आणि गाडी या अंडर १९ व सिनियर वुमेन्सच्या जंक्शन ला येऊन थांबली, आणि आम्ही सर्व वाट पाहू लागलो कधी पुढच्या प्रवासाचा हिरवा कंदील दाखवला जाईल याची. आम्हाला तरी कुठे कल्पना होती की खेळाची भूक कुतूहलाचा हात धरून करिअरचे उंच शिखर गाठेल. तसे आमच्या घरातील वातावरण खेळ आणि कलेसाठी पूरक होते. त्यामुळे तिच्या या क्षेत्रातील गरजा समजून घेताना त्रास झाला नाही. पण प्रत्येक मुलाला असे पोषक वातावरण मिळतेच असे नाही. हे सर्व या प्रवासातच कळायला लागले. प्रत्येकाचे गुण - दोष, परिस्थिती, मानसिकता आणि प्रत्येकाला आलेला अनुभव आणि बरेच काही. काही गोष्टी भिन्न होत्या परंतु बऱ्याच गोष्टी या थोड्याफार फरकाने सारख्याच होत्या. काही त्रास अगदी सर्वांना माहितीचे आणि सवयीचे झालेले होते. त्रास होता तो बाहेरच्या (क्रिकेट खेळा बाहेरील) वातावरणाचा, प्रत्येक ठिकाणी असतो तसा या ठिकाणी असणाऱ्या राजकारणाचा, लोकांच्या पक्षपातीपणाचा, इतरांच्या फायद्यासाठी होणाऱ्या मुलांच्या नुकसानीचा. हे सारे घडते, पण इतक्या लहान वयात हे पहावे लागणे हे योग्य नाही. निरागसपणा आणि कुतूहलाचा हा झोका आनंद देत असतानाच कोणीतरी त्या झोक्याचे दोर कापावे आणि आपण दाणकन जमिनीवर आपटावे अशीच ही अवस्था. पण हे या चिमुकल्या वयात का??... स्पर्धेच्या युगात हे सारे असते पण ही स्पर्धा ही निखळ असावी. पण असे झाले नाही.
जागोजागी फक्त हेच पाहायला मिळत होते. मुलांची क्रिकेट अकॅडमिमधील गर्दी वाढत होती, तशी अकॅडमीची फी सुद्धा वाढत होती. गर्दीत प्रशिक्षणाला अडथळा येत होता, मग पर्सनल कोचिंग हा प्रकार वाढू लागला. मुलांना हवे तसे प्रशिक्षण हव्या त्या वेळेत मिळणे कठीण होते. आम्ही मात्र पुन्हा कोणी "आचरेकर" (गॉडफादर) भेटतात का ते पाहत होतो. या सर्व प्रकारात मुलींकडे पाहणारे कोचेस् अगदी थोडे थोडकेच. त्यातून सर्व ठिकाणी मुलींची टीम तयार होवू शकत नव्हती. कारण मुलींची संख्या आणि त्यातून मुलींना खेळवणारे क्लब पुरेसे नव्हते. मग सिलेक्शन प्रकार, आणि सिलेक्शन म्हंटले की मग बरेच काही आले. प्रत्येक कोचला आपला / आपली प्लेअर सिलेक्ट व्हावी असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु प्लेअर टॅलेंटड असेल तर तशी भीती वाटण्याचे कारण नाही. पण नाही ना, तसे होत नाही. सिलेक्शन डे ला काय घडेल हे सांगणे मॅचमध्ये काय घडेल हे संगण्याईतकेच कठीण. त्यातून येणाऱ्या खेळाडूंची संख्या आणि सिलेक्ट होणाऱ्या खेळाडूंची संख्या यातील तफावत जास्त असल्याने अनेकांना निराशा येणे स्वाभाविकच. मग वर म्हंटलेल्या सर्व गोष्टींची प्रचिती आलेले खेळाडू पुन्हा आपली ताकद एकवटून पुढील सिलेक्शनच्य्या मागे लागतात. यात सिझन निघून गेला की प्लेअर्सच्या वाढत्या वयामुळे एज कॅटेगरिमधून बाहेर पडण्याची ही शक्यता वाढते. या सर्व प्रकारात वाईट वाटते ते परिस्थिती नसलेल्या मुलांचे. फाटके मोजे, जुन्या किटबॅग, कसे बसे जमवलेले साहित्य, गरिबी आणि जिद्द उराशी धरून गर्दीतून पुढे जायची वाट काढणारे. त्यातून खेळ चांगला असला तरी सीलेक्टर मेहेरबान होतीलच असे नाही. अगदी प्रायव्हेट टुर्नामेंट मध्येही नंबर लागेल का?, खेळायला मिळेल का?, मिळाले तर त्याच दिवशी परफॉर्मन्स चांगला होईल का?, झालाच तर सिलेक्टरचे लक्ष जाईल का? असे अनेक प्रश्न आणि त्यांची माहिती नसलेली उत्तरे एवढेच. त्यातून एमसीए मध्ये सिलेक्ट होणे आणि रणजी खेळायला मिळणे यासाठी वेगळे भाग्य असावे लागते. तिथे वेगळी स्पर्धा आणि वेगळा प्रवास. अर्थात आधीपासून विराजमान असलेल्या खेळाडूंना काढून त्याची जागा मिळवणे म्हणजे आपल्या खेळाची आणि नशीबाची कसोटी लागण्याचाच प्रकार.
बरे, हे सर्व क्रिकेट अकॅडमी आणि तिथले वातावरण आहे. पण शिक्षणाचे काय??.. शाळा शिकण्यापेक्षा ज्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये क्रिकेट टीम आहे तिथे एडमिशन घेणे जास्त महत्वाचे असल्याने तिथेही तीच गर्दी. मग अश्या शाळांची आणि कोचेसची डिमांड तर वाढणारच ना. त्यातून एखाद्या शाळेतून एखादा खेळाडू इंडिया खेळत असला तर मग विचारायलाच नको. हा टीम गेम असल्याने आणि शाळेच्या आंतर शालेय, जिल्हा पातळीच्या टुर्नामेंट खेळणे महत्वाचे असल्याने मुलांना ओपन स्कूल हा प्रकार ही करता येत नाही. त्यातून सर्वच शाळा या साथ देणाऱ्या असतातच असे नाही. मग शाळा अभ्यास आणि क्रिकेट प्रॅक्टीस (वरील सर्व अनुभव) ची कसरत करत हा खेळाडू इंडियन टीम पर्यंत पोहोचतो याला भाग्य आणि मेहनतीचा अचूक मिलाप असे म्हणता येईल. हे सर्व करून क्रिकेटमध्ये प्रत्येकाचे करिअर घडेलच असेही नाही. मग हे क्रिकेटमधील "दिलजले" दुसरीकडे जमेल तसे करिअर घडवत मागील खेळाडूंना आपले अनुभव सांगताना दिसतात.
सतत याच गोष्टी पाहून क्रिकेट मैदानावर कमी खेळला जातोय असे दिसू लागले. असेही आपल्या देशात क्रिकेट हा धर्मा प्रमाणे जपला जातो. पण तो पुरुष क्रिकेट, महिला क्रिकेटला अजूनही तितके महत्त्व दिले जात नाही. बहुदा महिलांच्या बाबतीत अजूनही लोक साशंक आहेत. त्यांना मिळणाऱ्या सोयी - सुविधा, संधी हे सर्वच मुलांच्या तुलनेत कमीच असते. पूर्वी कोणत्याही मैदानाकडे पाहिले की मुलांनी गच्च भरलेले असे. आता मैदानात मुली दिसल्या की आनंद होतो. मैदान आणि आकाश दोन्ही कमी पडतील अशा आविर्भावात मुली आता खेळू लागल्या आहेत. शिक्षणासोबतच खेळातही मुलींनी स्वतहाला सिद्ध केले आहे. खरेतर युद्धात लढणाऱ्या या शुरांगणाना स्वतःला कुठेही सिद्ध करण्याची मुळी गरजच नाही. गरज आहे ती पुरुषी संस्कृतीने स्त्रीचे हे गुण मानण्याची. आता मैदानात खेळणाऱ्या, कलेत भाग घेणाऱ्या, स्वतःच्या मनासारखे आयुष्य जगणाऱ्या मुलींच्या पाठीशी उभा त्यांचा खंभीर असा बाबा पाहून कौतुक वाटते. मुलगी झाल्यावर तिला चांदीचे पैंजण आणून देणाऱ्या बाबाला आता मुलींसाठी स्पाईक शूज आणून देताना पाहिले की वाटते की या संघर्षात त्या एकट्या नाहीत.
याचे कौतुक होत असतानाच दुसऱ्या बाजूकडे ही नजर घालायला हवी. जन्म देणाऱ्या बापाने स्वतःमध्ये हा बदल घडवून आणला आता सामाजिक आणि राजकीय बाप ही तितकाच खंबीर व्हायला हवा. त्याच्या साथ देण्याची ही तितकीच गरज आहे. मुलींना मिळणाऱ्या सोयी - सुविधा, त्यांच्या गरजा यांचा विचार व्हायला हवा. मुलींचे कर्तुत्व पटले असेल तर संधीची दार उघडायला हवीत. कधी मुलींना मॅचेस मिळत नाहीत, तर कधी मैदान मिळत नाही. मुलांसारखे मुलींचे वयोगट नाहीत, त्यांना हव्या तश्या प्रशिक्षणाची सोय होत नाही. कधी कोच ची संख्या अपुरी पडते तर कधी क्लब मिळत नाहीत. मुलींच्या टीम बनवण्याची गरज मुलांचे क्रिकेट चालवणाऱ्या कोचेस आणि संस्था - क्लब यांना वाटत नाही. अगदी गरजेच्या सोयी सुद्धा बऱ्याचदा मिळत नाही. वॉशरूम ची सोय नसते, असतात ते स्वच्छ नसतात. त्यामुळे आजार होण्याची शक्यता असते. चेंजिंग रूम नसते. मॅचमध्ये फिजिओ नसतात सोबत. मुलींबरोबर असणाऱ्या महिला पालकांची ही अशीच गैरसोय होते. या सर्व गोष्टींची मागणी करण्याची वेळ येता कामा नये. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणारे स्पॉन्सर मिळत नाहीत. महीला वर्ल्ड कप १९७२ ला सुरू झाले आणि पुरुष वर्ल्ड कप १९७५ ला, असे असूनही महिला आयपीएल मात्र पुरुष आयपीएलच्या १४ वर्षांनी सुरू होते. खरेतर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला रीप्रेझेंट करणारा हा खेळ, मग या खेळातील गोष्टींकडे आणि खासकरून यातील खेळाडूंकडे किती लक्ष द्यायला हवे याचा विचार ही व्हायला हवा. "आखिरकार देश कि इज्जत का सवाल है।"
खंत करावी तरी कशाची आणि किती??
एव्हढेच म्हणेन - आता तरी यांच्याकडे लक्ष द्या...
तेरी ऊंची शान है मौला,
मेरी अर्जी मान ले मौला,
तू है सबकुछ जाननेवाला,
मै हूं तेरा माननेवाला...
मुझको भी तो लिफ्ट करादे,
थोडी सी तो लिफ्ट करादे...
मधु भोसले

Comments
Post a Comment